पठाणकोट - सिनेजगतातील अनेक अभिनेते, अभिनेत्री लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करत असतात. त्यापैकी काही निवडणुका लढवून लोकप्रियतेच्या जोरावर निवडूनही येतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर ही मंडळी आपल्या दैनंदिन व्यापात गुंतून जातात. मग त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते. असाच काहीसा प्रकार भाजपाच्या तिकीटावर खासदार झालेल्या सनी देओल यांच्याबाबत घडला असून, निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना 80 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले होते. मात्र निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे फारसे न फिरकल्याने त्यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातूनच मतदारसंघातील प्रमुख शहर असलेल्या पठाणकोट येथे सनी देओल हे हरवल्याचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आपण यांना पाहिलंत का? भाजपा खासदार सनी देओल यांच्याबाबत मतदारसंघात लागले पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:01 AM