CM केजरीवाल यांच्या सुरक्षा ताफ्यात चूक, तीन शेतकरी गाडीवर धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 09:55 AM2021-09-30T09:55:35+5:302021-09-30T10:12:19+5:30
केजरीवाल हे लुधियाना येथे एका बैठकीसाठी आले होते. येथील उद्योगपती अगोदरच मिटींग हॉलमध्ये पोहोचले होते. पण, निषेध आंदोलनामुळे केजरीवाल यांना बैठकीला पोहण्यासाठी सव्वा तास उशीर झाला.
चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लुधियाना येथे शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात चूक झाल्याचा फायदा घेत तीन शेतकऱ्यांनी केजरीवाल यांच्या गाडीवर धाव घेतली. केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसोबत धोका केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून पंजाबमधील पाण्याच्या समस्येबाबतही स्पष्टीकरण देण्याची मागणी या युवकांनी केली आहे. सोनी पंडित आणि राजबीर यांच्या नेतृत्वात हा निषेध व्यक्त करण्यात आला.
केजरीवाल हे लुधियाना येथे एका बैठकीसाठी आले होते. येथील उद्योगपती अगोदरच मिटींग हॉलमध्ये पोहोचले होते. पण, निषेध आंदोलनामुळे केजरीवाल यांना बैठकीला पोहण्यासाठी सव्वा तास उशीर झाला. तत्पूर्वी केजरीवाल यांनी चंढीगड आणि दोराहा येथील आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
दरम्यान, यावेळी भगवान मान यांनी म्हटले की, इतर राजकीय नेते ड्रॉईंगर रुममध्ये बसून आपले जाहीरनामा तयार करतात. पण, आम आदमी पक्ष लोकांमध्ये जाऊन, त्यांना विचारात घेऊन जाहीरनामा बनवते. दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही टॅक्स कमी करण्यात येईल, असे मान यांनी यावेळी म्हटले.
नवज्योतसिंग सिद्धू आपमध्ये जाणार ?
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या एका दिग्गज नेत्याने ही शक्यता फेटाळून लावली आहे. आगामी निवडणुकांमध्ये एखादा सामान्य माणूस आम आदमी पक्षाचा चेहरा असेल. नवज्योत सिंग सिद्धू यांनी खुर्चीसाठी पंजाबमधील नागरिकांची फसवणूक केली आहे. ते कधीही आम आदमी पक्षात सामील होणार नाहीत, असे चीमा यांनी सांगितले.