न्यू यॉर्क, दि. 17 - संयुक्त राष्ट्रांत (यूएन) पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्याच्या निर्णयाला भारताने उर्दू भाषेतील एक म्हण वापरून उत्तर दिलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असलेले सैयद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचे नाव न घेता 'त्यांचा हा निर्णय म्हणजे मियां की दौड मस्जिद तक' आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
'जो मुद्दा गेल्या दशकांपासून संयुक्त राष्ट्राकडे प्रलंबित आहे अशा मुद्द्यावर जर ते (पाकिस्तान) लक्ष केंद्रीत करत असतील, तर त्यांचे असे करणे म्हणजे 'मियां की दौड मस्जिद तक की', अशाच प्रकारचे असेल' असं अकबरुद्दीन पुढे म्हणाले. 'गेली 40 वर्ष या मुद्द्यावर (काश्मीर प्रश्न) संयुक्त राष्ट्रात औपचारिक स्वरुपाचीही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे जर हा मुद्दा कुणी उचलत असेल तर ते वेळ वाया घालवण्यासारखं असेल असं ते म्हणाले. 'आम्ही आमचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट केले आहे. आमचा दृष्टीकोन प्रगतीशील आहे. दुसरीकडे मात्र असेही देश आहेत, जे कालच्या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. अशा प्रकारचे लोक हे कालचेच लोक आहेत, अशा शब्दांत अकबरुद्दीन यांनी टीका केली.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान भारत आपल्या प्रगतीशील, पुरोगामी कार्यक्रमावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे अशी माहितीही अकबरुद्दीन यांनी यावेळी दिली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांना संबोधित करताना काश्मीरचा मुद्दा उचलणार आहेत असे स्पष्ट केले आहे. भारतातर्फे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रात भाषण करणार आहेत.