‘युती’ फुटीने आमदार धास्तावले
By admin | Published: September 23, 2014 05:07 AM2014-09-23T05:07:08+5:302014-09-23T05:07:08+5:30
आम्हाला युती हवी आहे, पण आमचे ऐकते कोण? नेते ठरवतील त्या निर्णयासोबत जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही,
यदु जोशी, मुंबई
आम्हाला युती हवी आहे, पण आमचे ऐकते कोण? नेते ठरवतील त्या निर्णयासोबत जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा आणि शिवसेनेचे बहुसंख्य आमदार व्यक्त करीत आहेत. युती तुटली तर सत्ता येणे कठीण आहे, अशी बहुतेक आमदारांची भावना आहे.
‘युती हवी की, नको?’ असा थेट प्रश्न भाजपा आणि शिवसेनेच्याही आमदारांना सदर प्रतिनिधीने केला असता ९० टक्के आमदार म्हणाले, आमचे नाव देऊ नका; पण युती झालीच पाहिजे, असे आम्हाला वाटते. आता कुठे सत्ता मिळण्याची चिन्हे दिसत असताना आमचे नेते एकमेकांशी भांडत असल्याचे पाहून वाईट वाटते, असा सूर आमदारांनी लावला.
जागावाटपाच्या वादामुळे आमदार हवालदिल झाले असून अनेकांनी ‘युती टिकवा’ असे एसएमएस नेत्यांना पाठविणे सुरू केले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना असे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करीत असलेले शिवसेनेचे आमदार युती तुटण्याच्या भीतीने हैराण आहेत.
हीच परिस्थिती शिवसेनेच्या प्रभावपट्ट्यातील भाजपा आमदारांची आहे. आम्ही मतदारसंघात फिरतो, लोक काय म्हणतात ते आम्ही सांगतोय, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेचे एक आमदार म्हणाले, ‘तुम्ही पत्रकारांनी आमच्या नेत्यांना सांगितले पाहिजे; आम्हाला मर्यादा आहेत’. दुसऱ्या एका आमदाराने तर एसएमएसचा मजकूरच फॉर्वर्ड केला अन् म्हणाले ‘जरा आमच्या नेत्यांना फॉर्वर्ड करता का?’