मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:31 AM2023-09-28T11:31:10+5:302023-09-28T11:31:33+5:30
इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली.
मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा बिघडत चालली आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे मणिपूरमध्ये हिंसाचार वाढत आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांसाठी अफ्स्पा वाढवण्यात आला आहे. दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, 27 सप्टेंबरला थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला जमावाने आग लावली. याशिवाय, इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली.
प्रेस नोट जारी करत पोलिसांनी गेल्या 24 तासांत राज्यातील वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी 1697 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह बुधवारी विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष विमानाने इंफाळ येथे पोहोचले.
राजधानी इंफाळसह अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि बनावट बॉम्बचा वापर केला. तसेच पेलेट गनमधून गोळीबार केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्याचवेळी एका विद्यार्थ्याच्या डोक्यात कोंडा घुसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या दोन दिवसांत इंफाळ खोऱ्यात झालेल्या निदर्शनांमध्ये 50 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.
अफ्स्पा लावण्याचा निर्णय
राज्यातील डोंगराळ भागात अफ्स्पा (AFSPA) लागू राहील. सरकारने 1 ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यातून केवळ 19 पोलीस ठाण्याचे क्षेत्र वेगळे ठेवण्यात आले आहे. राज्याचा उर्वरित भाग अस्ताव्यस्त घोषित करण्यात आला आहे. AFSPA च्या बाहेर ठेवण्यात आलेल्या 19 पोलीस ठाण्यांमध्ये इम्फाळ, लेनफले, सिटी, सिंगजमेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पत, हांगेंग, लमलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबुल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरोंग, काकबचिंग आणि जिबचिंग यांचा समावेश आहे.