रस्ते बांधणीवर मोबाइल अॅपची नजर, काम झाल्यानंतर अॅपवर द्यावे लागतील अपडेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:06 AM2017-10-05T04:06:12+5:302017-10-05T04:06:47+5:30
रस्त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी मोबाइल फोनने त्यावर देखरेख ठेवली जाईल.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : रस्त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी मोबाइल फोनने त्यावर देखरेख ठेवली जाईल. त्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
अधिका-यांना दौरा केल्यानंतर कामाची माहिती त्यात नोंदवावी लागेल. सामान्य लोकही लवकरच राष्ट्रीय महामार्गांच्या अवस्थेवरून दर्जा (रेटिंग) देऊ शकतील. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाअंतर्गत काम करीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक मिश्रा म्हणाले की, रस्त्यांच्या कामांच्या आढाव्यासाठी जाण्याआधी, आपण कोणत्या प्रकल्पाचा दौरा करीत आहोत, हे कळविण्याचे बंधन अधिका-यांवर असेल. नंतर प्रकल्पाचा अहवाल सादर करावा लागेल आणि कामाची छायाचित्रेही अॅप्लिकेशनमध्ये अपलोड करावी लागतील.
मिश्रा म्हणाले की, सध्या ही माहिती विभागीय स्तरावर असेल, परंतु लवकरच सामान्य लोकही ती पाहू शकतील, अशी व्यवस्था केली जाईल. प्रोजेक्ट मॉनिटरिंग इन्फर्मेशन सीस्टिम अॅप्लिकेशनमध्ये प्रत्येक प्रकल्पावर अगदी जवळून देखरेख ठेवली जाण्यासाठी अधिकाºयांकडून १८० प्रकारच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. ज्या क्षेत्रात काम मागे पडत चालले असल्याचे दिसेल, ते अॅप्लिकेशनद्वारे चटकन कळेल. या अॅप्लिकेशनद्वारे राज्यांतील वेगवेगळे अधिकारी एकाच व्यासपीठावर एकमेकांशी जोडले जातील. यात कोणी खोटी माहिती दिली गेल्यास, तो लगेचच पकडला जाईल.
एका विदेशी कंपनीच्या सल्ल्यानुसार हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. ते अँड्रॉइड व अॅपल अशा दोन्ही फोनवर काम करील. प्राधिकरणचे प्रत्यक्ष कामावरील व मुख्यालयातील अधिकाºयांसाठी ते उपलब्ध असेल. त्याला कोणत्याही प्रकल्पाच्या डॅशबोर्डवरून डाउनलोड केले जाऊ शकते.