नवी दिल्ली, दि. 5 - ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली आहे. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं आहे.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एस जयशंकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वारंवार दोन्ही नेत्यांनी चर्चेत पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यावर भर दिला असल्याचं सांगितलं. एस जयशंकर हे डोकलाम वादाच्या पार्श्वभुमीवर बोलत होते हे नक्की होतं. मात्र त्यांनी एकदाही डोकलामचा उल्लेख केला नाही.
दोन्ही देशांनी सीमारेषेवर शांतता राहावी यावर एकमत दर्शवलं आहे. आपापसातील नातं दृढ व्हावं यासाठी दोन्ही देशांनी अजून प्रयत्न करत पुढे वाटचाल करणं गरजेचं असल्याचंही दोन्ही देशांनी सांगितलं आहे. डोकलामसंबंधी प्रश्न विचारला असता एस जयशंकर यांनी भुतकाळात जे झालं त्यावर चर्चा करण्यापेक्षा भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यावर भर दिल्याचं सांगितलं.
'काय झालं हे दोन्ही देशांना माहित आहे. हे काय झालं यावर चर्चा नव्हती, पण काय होईल यासाठी होती', असं एस जयशंकर बोलले आहेत. महत्वाचं म्हणजे या चर्चात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चर्चा झाली नाही. मात्र घोषणापत्रात दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. 'दहशतवादामुळे समोर उभी राहिलेल्या आव्हानांबद्दल सर्व देशांचं एकमत आहे. फक्त भारतालाच वाटतं असं नाही. अनेक देशांचं दहशतवादावर हेच मत आहे. घोषणापत्रातून सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे', असं एस जयशंकर यांनी सांगितलं.
याआधी ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास'चा नारा दिला. मंगळवारी 'डायलॉग ऑफ इमर्जिंग मार्केट्स अँण्ड डेव्हलपिंग कंट्रीज' कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा नारा दिला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाच्या आर्थिक विकासासाठी सबका साथ, सबका विकास गरजेचं असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात पुढे येत असलेल्या देशांमध्ये सहकार्य महत्वाचं असल्याचं सांगितलं. पुढील दशक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पुढील दशक सुवर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.