नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 3 राज्यांतील पराभवानंतर मोठी सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी सरकार तब्बल 4 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्याचा 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तीन राज्यांत शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या नाराजीमुळेच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याची चर्चा आहे. आता त्याचीच दखल घेत भाजपा ही कर्जमाफी करण्याची शक्यता आहे. एनडीए सरकारसमोर आता 2019च्या लोकसभा निवडणुकीचं मोठं आव्हान आहे. अशातच जनमानसात भाजपाबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याबरोबरच शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात येऊ शकते. खरं तर मोदी सरकारच्या मंत्र्यांमध्येच कर्जमाफीवरून दुमत आहे. कर्जमाफीनं शेतकऱ्याचं काहीही भलं होत नाही. त्यांच्या मूळ समस्या कशा सोडवता येतील यावर भर देण्याची गरज आहे. त्या समस्यांवर काम करण्याची गरज आहे, असाही एक मतप्रवाह आहे. 2009मध्येही काँग्रेसनं निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीनं कर्जमाफीची घोषणा करून सत्ता मिळवली होती. त्यामुळे मोदी सरकारही काँग्रेसचा तोच फॉर्म्युला पुन्हा वापरण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातही मोदींच्या या फॉर्म्युल्यानं त्यांना नेत्रदीपक यश मिळवून दिलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी जेव्हा राहुल गांधींनी शेतकरी यात्रा सुरू केली, त्याचदरम्यान मोदींनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याच्या फायदा होऊन उत्तर प्रदेशात भाजपाच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या होत्या.
मोदी सरकार आज करणार मोठी घोषणा, 4 लाख कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 8:30 AM
मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे...
ठळक मुद्देमोदी सरकार एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.तब्बल 4 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.