मोदी सरकारच्या 'या' 3 योजना गरिबांसाठी ठरतायेत वरदान, करोडो लोक घेतायेत लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:04 AM2023-11-15T10:04:16+5:302023-11-15T10:04:45+5:30
Modi Government Schemes : मोदी सरकारच्या 3 लोककल्याणकारी योजना, ज्याचा लाभ गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक घेऊ शकतात.
नवी दिल्ली : लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मोदी सरकार सजग दिसत आहे. सरकारच्या अनेक योजना असल्या तरी मोदी सरकारच्या अशा काही योजना आहेत, ज्या अत्यंत गरीब आणि गरजूंसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. दरम्यान, जाणून घ्या, मोदी सरकारच्या 3 लोककल्याणकारी योजना, ज्याचा लाभ गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक घेऊ शकतात.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना :
देशातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मोदी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते आणि अनुदानावर वर्षभरात 12 गॅस सिलिंडर मिळतात. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकारी अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. 1 मार्च 2023 पर्यंत उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत. केंद्र सरकारने या योजनेच्या विस्तारासाठी एक योजनाही जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 1650 कोटी रुपये खर्चून 75 लाख नवीन उज्ज्वला एलपीजी कनेक्शन जारी केले जातील.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना :
मोदी सरकारने ही योजना कोरोनाच्या काळात म्हणजेच मार्च 2020 मध्ये सुरू केली. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान ही योजना सुरू करून मोदी सरकारने देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले होते. केंद्र सरकारने या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या या योजनेचा लाभ डिसेंबर 2023 पर्यंत मिळू शकतो. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी नागरिकांना दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिला जातो. डिसेंबरनंतरही ही योजना सुरू राहू शकेल, असे म्हटले जात आहे.
आयुष्मान भारत योजना :
देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. यामध्ये औषधांचा, उपचाराचा खर्च सरकार उचलते. या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांचे उपचार आयुष्मान कार्डद्वारे सरकारने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत मिळवू शकतात. या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार 'आयुष्मान भव' मोहीम देखील चालवत आहे, ज्या अंतर्गत पात्र लोकांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. ही योजनाही आतापर्यंत गरिबांसाठी वरदान ठरली आहे.