मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:58 AM2021-06-01T05:58:42+5:302021-06-01T08:21:35+5:30
सरकारचे ‘टीओटी’ माॅडेल; महामार्गापासून उत्पन्न मिळविण्याची योजना
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निधी उभारण्याची गरज आहे. ती विचारात घेऊन केंद्र सरकारने काही पायाभूत क्षेत्रांमधून उत्पन्न मिळविण्याची याेजना आखली आहे. त्यातून पुढील पाच वर्षांमध्ये ८५ हजार काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात महामार्गांच्या माधमातून १० हजार २५० काेटींचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, हे लक्ष्य गाठता आले नाही. आता चालू आर्थिक वर्षात सरकारचा १० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाची याेजना आहे. पुढील आर्थिक वर्षात २० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य आहे.
गेल्या आर्थिक वर्षात सरकारला ५६६ किलाेमीटर अंतराच्या महामार्गाद्वारे ५ हजार काेटी रुपयांचे उत्पन्न ‘टाेल ऑपरेट ट्रान्सफर‘ (टीओटी) या याेजनेतून प्राप्त झाले हाेते. ‘टीओट’ माॅडेलच्या माध्यमातून महामार्गांद्वारे उत्पन्न प्राप्त करण्याची सरकारची याेजना आहे.
काय आहे ‘टीओटी’ माॅडेल?
स्थावर मालमत्ता ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’कडे हस्तांतरित करण्यात येतील. त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस आमंत्रण देण्यात येईल. सार्वजनिक निधीतून पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी बाेली लावण्यात येईल. हे प्रकल्प खासगी गुंतवणूकदारांना ३० वर्षांसाठी चालविण्यास देण्यात येतील. यामुळे प्रकल्पांचे परिचालन आणि देखभाल करणे साेईचे हाेईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचाही सहभाग सरकारला कमी करायचा हेतू आहे.