नवी दिल्ली - राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि भाजपाचे माजी लोकसभा खासदार आणि परेश रावल यांची नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी परेश रावल यांची नियुक्ती केली. सध्या या पदावर राजस्थानी कवि अर्जुन चरण हे कार्यरत असून लवकरच परेश रावल पदभार स्विकारतील. चरण हे 2018 मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले होते. चित्रपट क्षेत्रात गेल्या 35 वर्षातील कामाची दखल घेत सरकारने त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत, परेश रावल यांचं अभिनंदन केलंय. प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांची महामहीम राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रावल यांच्या प्रतिभावान व अनुभवाचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. हार्दीक अभिनंदन... असे ट्विट प्रल्हाद सिंह पटेल यांनी केलंय.
नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एनएसडी परिवारात या लिजंड कलाकाराचे स्वागत आहे. एनएसडीला एका विशिष्ठ उंचीवर नेण्याचं काम ते आपल्या अनुभवातून करतील, असेही या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.
1984-85 मध्ये केली होती करिअरची सुरुवात
परेश रावल यांच्या फिल्मी करियरची सुरुवात 1984 मध्ये आलेल्या 'होली' चित्रपटातून झाली होती. यानंतर 1985 मध्ये आलेल्या 'अर्जुन'मध्येही ते दिसले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घरं केलं आहे. सुरुवातीच्या काळाच चित्रपटात व्हिलनच्या रुपात दिसणाऱ्या परेश रावल यांनी नंतरच्या काळात कॉमेडी रोलही केले. हेराफेरी चित्रपटातील बाबूराव गणपतपाव आपटे या पात्राची त्यांची भूमिका प्रचंड गाजली. सन 1993 मध्ये 'सर' आणि 1994 मध्ये 'वो छोकरी' या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच, चित्रपटातील उल्लेखनीय कामामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, २०१४ मध्ये परेश रावल भाजपातर्फे लोकसभेवर निवडून आले होते.