नवी दिल्ली : सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्षराहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं नाही तर भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. तसंच, 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन भाजपानं खोटं दिलं होतं. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा रोजगारीचा आहे. मोदी सरकारनं केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
याचबरोबर, मसूद अझहरला भाजपानं देशाबाहेर सोडलं, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले. याशिवाय, देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, ते घाबरतात. दबाव आला की नरेंद्र मोदी पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसंच, देशाचा पंतप्रधान कोण असेल, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'देशाचे लोक जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल, मात्र सध्या माझं काम हे देशाच्या संस्थांना वाचवणं आहे.'
चौकीदार चोर है, या वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची मागितली आहे. मात्र या नाऱ्याबद्दल माफी मागितली आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच राफेल करारातून चौकीदारानं 30 हजार कोटींची चोरी केल्याचा आरोपही नरेंद्र मोदींवर केला.