मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्या मोदींनीच आता मौन सोडावे; मनमोहन सिंग यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:33 AM2018-04-19T01:33:17+5:302018-04-19T01:33:17+5:30
कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत.
नवी दिल्ली : कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत. आता स्वत:च्या सल्ल्याची पंतप्रधान मोदी यांनी अंमलबजावणी करावी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या मौन धारण करण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ते काही तरी बोलले, याचे अर्थातच मला समाधान आहे, असा टोलाही माजी पंतप्रधानांनी लगावला आहे.
डॉ. सिंग म्हणतात की, मोदी मला बोलण्याचा सल्ला सतत देत असत. आता त्यांनी स्वत:च्या आपल्या सल्ल्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी नियमित बोलायला हवे. दिल्लीमध्ये २०१२ मध्ये निर्भया बलात्काराची घटना घडल्यानंतर आमच्या सरकारने बलात्काराच्या कायदा अधिक कठोर केला होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
अत्याचारांकडे सरकारचे दुर्लक्ष
कथुआ बलात्कार प्रकरण मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अधिक गांभीर्याने हाताळायला हवे होते, असे सांगून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, कदाचित जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाचा त्यांच्यावर दबाव असावा. भाजपाच्या दोन मंत्र्यांनी बलात्काराचे उघडपणे समर्थन केले, याबद्दल टीका करून ते म्हणाले की, महिलांची सुरक्षितता, मुस्लिमांची हत्या व एकूणच देशातील कायदा व सुव्यवस्था याबाबत मोदी सरकार काहीच करताना दिसत नाही. दलितोवरील वाढते अत्याचार ही गंभीर बाब असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
भाजपाचे प्रत्युत्तर
भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी कधीच गप्प राहत नाहीत.
ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्याकडे गंभीरपणे पाहिले जाते आणि लगेच कारवाईही केली जाते.