मोदी पुतीन यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:27 AM2018-05-18T05:27:56+5:302018-05-18T05:27:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ मे रोजी रशियाच्या सोची शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ मे रोजी रशियाच्या सोची शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. ही चर्चा अनौपचारिक असणार आहे आणि या वेळी मोदी यांच्यासाठी ‘गार्ड आॅफ आॅनर’असणार नाही. तसेच, कोणत्याही दस्तऐवजावर हस्ताक्षर होणार नाहीत. या चर्चेचा कोणताही अजेंडा असणार नाही. दोन्ही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विषयांपासून देशांतर्गत राजकारणावर चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच चीनमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशाी अनौपचारिक चर्चा केली होती. त्याचप्रमाणे ही दुसरी अनौपचारिक चर्चा आहे. असे समजले जात आहे की, मोदी यांच्या विदेशनीतीचा हा नवा अध्याय आहे. या माध्यमातून ते जगातील नेत्यांसोबत राजकीय नात्याला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सूत्रांनी सांगितले की, ही चर्चा अनौपचारिक असली तरी, या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही देशात उर्जा क्षेत्रात संयुक्त उपक्रम उभारण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रशियासोबत उर्जा क्षेत्रात एकत्र काम करु इच्छितो. आम्ही संयुक्त कंपनी बनविण्याबाबतही काम करु इच्छितो. केवळ भारत, रशियात नव्हे, तर अन्य देशात मिळून काम करणे शक्य होईल. याशिवाय अणुउर्जा क्षेत्रात रशियासोबत भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अध्यक्ष पुतीन यांना भेटतील तेव्हा या विषयावर चर्चा होईल.
या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बहुप्रतीक्षित गॅस पाइपलाइनवर चर्चा होऊ शकते काय? असा प्रश्न केला असता या अधिकाºयाने सांगितले की, हा मुद्दा दोन्ही देशात औपचारिक स्वरुपात होणाºया बैठकीत येईल. ही बैठक यावर्षी दुसºया सहामाहीत होऊ शकते.
>अनेक मुद्दयांवर चर्चा
या मुलाखतीतील अन्य महत्वाच्या मुद्यांवर एका अधिकाºयाने सांगितले की, अमेरिकेने इराणवर प्रतिबंध लावण्यासोबतच रशियावरही प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे. अशावेळी भारतासाठी दुहेरी समस्या होऊ शकते. इराणकडून कच्चे तेल खरेदीची समस्या होऊ शकते.
तथापि, भारत आपल्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करतो. अशावेळी
अमेरिकी प्रतिबंधामुळे डॉलरमध्ये याची खरेदी शक्य होणार नाही. असे सांगितले जात आहे की, या दोन्ही मुद्यांवरही पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते. रशियाला इराणचा समर्थक मानले जाते.