मोदींची हवा संपली, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम - शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 06:28 PM2017-10-26T18:28:06+5:302017-10-26T18:31:21+5:30
देशातील जनता सर्वात मोठी शक्ती आहे. ही जनता जेव्हा वाटेल तेव्हा कुणालाही पप्पू बनवू शकते, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणणं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने ते गुजरात आणि देशातील इतर भागातील लोकांशी संवाद साधत आहेत. तसेच प्रचार करत आहेत त्यावरून ते देशाचं नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचं स्पष्ट होत असल्याचे रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशातील जनता सर्वात मोठी शक्ती आहे. ही जनता जेव्हा वाटेल तेव्हा कुणालाही पप्पू बनवू शकते, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला. आजतक या वृत्तवाहिनीने मंथन आजतक 2017 हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यातील मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
या मुलाखतीत दोन्ही नेत्यांना शिवसेना-भाजपाच्या सध्याच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. भाजपसोबत आमची युती तीन दशकांची आहे. त्यांचे काही मुद्दे आम्हाला पटले नाही तर आम्ही ते स्पष्ट बोलून दाखवतो असे संजय राऊत यांनी म्हटले. तर दोन्ही पक्षांचे धोरण काही प्रमाणात वेगळे असले तरीही मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात कॅबिनेटच्या बैठकीत कोणतेही मोठे मतभेद झालेले नाहीत असे विनोद तावडे यांनी म्हटले.
मोदींची हवा संपली का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील हवा संपली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. देशात मोदींची हवा राहिली नसल्याचं गुजरातमधून स्पष्ट होत आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जनता नाराज
जीएसटी लागू झाल्याने लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या मोदी सरकारच्या निर्णयामुळे जनता नाराज झाली आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर
भाजपा महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर उभे राहण्यासाठीच प्रयत्न करेल आम्हाला शिवसेनेची गरज भासणार नाही अशीच आमची रणनीती असणार आहे असे तावडे यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चूकीचे
राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चूक आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये ते आत्ता प्रभावीपणे काम करत आहेत. देशाच्या जनतेपेक्षा मोठे कोणीही नाही. ही जनता हवे त्याला पप्पू बनवू शकते असाही टोला राऊत यांनी लगावला.
भाजपा आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी अशक्य
यावेळी राऊत यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकणार नाही असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. पण राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत कुणाच्याबाबतीत ठोस काही सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.