मोहम्मद शामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?; 'या' मोठ्या पक्षानं दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:08 AM2024-03-08T09:08:45+5:302024-03-08T09:10:24+5:30
या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरोधात दमदार कामगिरी करत ५७ रन्स देऊन ७ विकेट घेतल्या होत्या.
कोलकाता - BJP Offer to Mohammed Shami ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेली भाजपापश्चिम बंगालमध्ये क्रिकेटमधील मोठ्या चेहऱ्यावर डाव लावू शकते. भाजपाच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये क्रिकेट स्टार मोहम्मद शामी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून खेळताना शामी एक वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आला. शामी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी आजही तो बंगालसाठी देशातंर्गत क्रिकेट खेळतो.
सूत्रांनुसार, भाजपा नेतृत्वाने मोहम्मद शामीला ही ऑफर दिली आहे. त्यावर शामीचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे. सध्या सर्जरीमुळे शामीनं क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. मोहम्मद शामी याला येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. शामी निवडणुकीच्या मैदानात उतरला तर भाजपाला बंगालमध्ये अल्पसंख्याकबहुल जागांवर विजय मिळू शकतो असं भाजपाला वाटते.
भाजपाला बशीरहट लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद शामीला उभं करायचं आहे. हा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. ज्या संदेशखाली इथं अलीकडेच महिलांवर अत्याचाराची गंभीर घटना घडली तो भाग बशीरहट लोकसभेचा आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या अधिक आहे. मोहम्मद शामीला या मतदारसंघातून निवडणुकीला उभं करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक मानला जातो.
मागील वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शामीने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले. ३३ वर्षीय शामीने वर्ल्डकपमध्ये एकूण ७ मॅच खेळल्या. त्यात २४ विकेट पटकावल्या होत्या. या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरोधात दमदार कामगिरी करत ५७ रन्स देऊन ७ विकेट घेतल्या होत्या. ही कामगिरी ५० षटकांच्या वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय खेळाडूने केली होती.
दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करुन काळजी घेणारे ट्विट केले होते. तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य मिळावे ही इच्छा, मला विश्वास आहे की तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल अशा सदिच्छा मोदींनी दिल्या होत्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांकडून मला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारी वैयक्तिक चिठ्ठी मिळणे हे आश्चर्यकारक आहे. त्यांचा हा आपलेपणा आणि विचारशीलता माझ्यासाठी खरोखर आज खूप महत्त्वाचा आहे. मोदी सर, आपल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असे मोहम्मद शमीने म्हटलं होतं.