नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पैसे वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील विरुधुनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार मणिकम टागोर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विरुधरनगरचे उमेदवार मणिकम टागोर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान नोटांचे वाटप करण्यात आले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये मणिकम टागोर हे विरुधुनगरमधील निवडणूक प्रचार कार्यक्रमात उपस्थित लोकांना रोख रक्कम वाटप करताना दिसून येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, पोलीस अधीक्षक बीके अरविंद यांनी सांगितले की, मणिकम टागोर यांची मदुराईमध्ये रोख वाटप करतानाची व्हिडिओ क्लिप खरी आहे. तत्पूर्वी बुधवारी, मणिकम टागोर यांनी मदुराई येथे निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला संबोधित केले होते.
दुसरीकडे, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मणिकम टागोर यांनी सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे (न्याय पत्र) कौतुक केले. महालक्ष्मीच्या या कार्यक्रमात येथील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमचा जाहीरनामा लोकांबद्दल बोलतो. लोक आमच्या 'न्याय पत्र'ला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, असे मणिकम टागोर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यावर मणिकम टागोर म्हणाले की, दक्षिणेकडील राज्याचा त्यांचा दौरा असूनही तामिळनाडूतील जनता मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही वेळा आपल्या राज्याला भेट दिली, तरी त्यांना तामिळ लोकांकडून नाकारले जाणार आहे. तामिळनाडू मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पाठीशी उभे आहे आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे एमके स्टॅलिन यांचे उद्दिष्ट साध्य होईल, असे मणिकम टागोर यांनी सांगितले.
दरम्यान, तामिळनाडूमधील लोकसभेच्या सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेस, व्हीसीके, एमडीएमके, सीपीआय, सीपीआय (एम), आययूएमएल,एमएमके, केएमडीके, टीव्हीके आणि एआयएफबी यांचा समावेश असलेल्या डीएमकेच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह आघाडीने 39 पैकी 38 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता.