पुणे : देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले १० दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली आहे. मॉन्सूनने बुधवारी बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला असल्याने हवामान विभागाने जाहीर केले आहे. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्वअरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मेरोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखीथोडा पुढे सरकला होता. त्यानंतर २७ मे रोजी त्याने पुढे वाटचाल सुरु केलीआहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.४ अंश सेल्सिअस तर,सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.६ अंश सेल्सिअस नोंदविलेगेले आहे. देशात पश्चिम राजस्थानात काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आली आहे. हरियाणा, दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आहे. उत्तर मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान,मराठवाडा व सौराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमान ५० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या व मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली आहे.२८ व २९ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ३० मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
इशारा : २८ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. २९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. ३० मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. ३१ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे........२८ मे रोजी जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.३१ मे रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.