नवी दिल्ली : हवामान खात्याचे सर्व अंदाज खोटे ठरवीत सक्रिय झालेल्या नैऋत्य मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. मान्सून विलंबाने येणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु मान्सून वेगाने कूच करीत देशाच्या बहुतांश सर्व भागांत निर्धारित वेळेच्या आधीच दाखल झाला आहे.नैऋत्य मान्सून आता पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागांकडेही कूच करीत आहे. २६ जून रोजी मान्सून संपूर्ण भारतभरात दाखल झालेला आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. सामान्यत: मान्सून १५ जुलैपर्यंत संपूर्ण भारतात दाखल होत असतो. मान्सून पश्चिम राजस्थानात सर्वांत शेवटी दाखल होतो; पण यावेळी तो लवकर दाखल झाला आहे. मागील २४ तासांत चांगला पाऊस पडल्याचे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. यंदा मान्सूनने चार दिवस उशिरा म्हणजे ५ जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता; परंतु त्यानंतर मान्सूनचा वेग वाढला आणि त्याने अवघ्या २१ दिवसांतच संपूर्ण देश व्यापून टाकला.यापूर्वी २०१३ मध्ये मान्सूनने अशीच निर्धारित वेळेच्या अगोदर संपूर्ण देशात धडक दिली होती. १ जूनपासून आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच वायव्य भारताने सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस अनुभवला आहे.