नवी दिल्ली - तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 1900 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 1900 जणांना जीव गमवावा लागला आहे तर 46 जण बेपत्ता आहेत. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 राज्यांमध्ये जवळपास 25 लाखांहून अधिक लोकांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. भूस्खलनच्या समस्येचाही सामना करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 382 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पूर आणि वीज पडल्याने 227 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण 357 जिल्ह्यांना यावर्षी पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांचा सामना करावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे 738 लोक जखमी झाले आहेत. तर सुमारे 20 हजार जनावरे मृत्युमुखी पडली. पाऊस व पुरांमुळे 1.09 लाख घरे पडली आणि 2.05 लाख घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरांमुळे तब्बल 14.14 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकेही नष्ट झाली आहेत. 30 सप्टेंबर रोजी अधिकृतरीत्या मान्सून संपत असला, तरी अद्याप देशातील काही भागांमध्ये अद्याप मान्सून सक्रिय आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सर्वसाधारणपणे कोरडे हवामान होते. मात्र, शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पहाटे साडेआठ ते साडेअकरा दरम्यान तीन तासांत मुंबईत 13 मिमी पाऊस पडला. पुढील एक आठवडाभर मुंबईत पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कारण चक्रवाती परिस्थिती तामिळनाडूवर असून, तेथून उत्तर आणि गोवा आणि कोकण विभागात हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. येते काही दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात निरंतर पाऊस सुरू राहील. 8 ऑक्टोबरच्या सुमारास, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लगतच्या भागात चक्रवाती परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसात वाढ होईल. कोकण आणि गोव्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.