नवी दिल्ली: सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वाढत्या महागाईवरुन विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसखासदार ज्योतिर्मनी, रम्या हरिदास, मणिकम टागोर, टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सभापती बिर्ला यांनी सभागृहात आंदोलक खासदारांना अंतिम इशारा दिला. पण, खासदार ऐकत नव्हते. महागाईसह इतर मुद्द्यांवर विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केल्याने लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी या चार खासदारांवर ही कारवाई केली आहे. तसेच, लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
नेमकं काय झालं?अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच संसदेच्या आवारात फलक घेऊन जाण्यास आणि निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली होती. मणिकम टागोर, रम्या हरिदास, ज्योतिर्मनी आणि टीएन प्रतापन यांनी फलक घेऊन संदेच्या आवारात महागाईविरोधात निदर्शने केली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. काँग्रेस खासदारांवरील कारवाई नियम 374 अन्वये करण्यात आली आहे.