लष्करी मुख्यालयावर मोर्चाचा प्रयत्न अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:20 AM2018-12-18T06:20:49+5:302018-12-18T06:21:33+5:30
काश्मिरात निर्बंध; मिरवाईज उमर फारुक, यासीन मलिक स्थानबद्ध
श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत सात नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ बदामी बाग येथील लष्कराच्या चिनार कॉर्पस् मुख्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचा आंदोलकांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी लादलेल्या निर्बंधांमुळे विफल ठरला. हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक यांना सोमवारी पोलिसांनी स्थानबद्धतेत ठेवले आहे.
या परिसरातील सर्व दुकाने, पेट्रोलपंप व अन्य व्यावसायिक आस्थापने बंद होती तर संवेदनशील भागामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुक, मोहम्मद यासीन मलिक यांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. शनिवारच्या चकमकीनंतर फुटीरतावाद्यांनी तीन दिवसांचा बंदही पुकारला होता. त्यामुळे चिनार कॉर्पस् मुख्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी, तसेच पुलवामा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे या भागात लष्करी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नव्हते. सर्वत्र शुकशुकाट होता. या मोर्चात नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले होते. श्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. इतक्या सगळ्या उपाययोजनांमुळे आंदोलकांना मोर्चा काढता आला नाही. (वृत्तसंस्था)
सुरक्षा दलावर टीका
हुरियत नेते मिरवाईज उमर फारुक यांनी स्थानबद्धतेस विरोध करून ते आपल्या समर्थकांसह निघीन येथील निवासस्थानातून निघाले व त्यांनी चिनार कॉर्पस् मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव करून मिरवाईज यांना ताब्यात घेतले. त्याआधी पत्रकारांना त्यांनी सांगितले की, सुरक्षा दले ही माणसे मारण्याची यंत्रे बनली आहेत. नागरिक, लहान मुलांना चकमकीत ठार मारून त्यांना दहशतवादी संबोधणे निषेधार्ह आहे.