गुजरातमधील कच्छ भागात धौलावीरा नावाचं ऐतिहासिक जागतिक वारसास्थळ आहे. येथून ५१ किमी अंतरावर लोद्राणी गावामध्ये जमिनीत सोनं असल्याचं सांगितलं जायचं. या सोन्याच्या आशेने येथील ग्रामस्थांनी पाच वर्षांपूर्वी येथे खोदकाम सुरू केलं होतं. मात्र आता पाच वर्षांनंतर सोन्या ऐवजी या ग्रामस्थांना येथे हडप्पाकाळातील एका तटबंदी असलेल्या वस्तीचा शोध लागला आहे. प्राथमिक शोधानंतर पुरातत्त्ववेत्त्यांनी येथील खोदकामाची सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत.
या खोदकामामधून पुरातत्त्ववेत्यांच्या हाती ऐतिहासिक ठेवा लागला आहे. ऑक्सफोर्डच्या स्कूल ऑफ आर्कियोलॉजीशी संबंधित असलेले अजय यादव आणि त्यांचे प्राध्यापक डॅमियन रॉबिन्सन हे या खोदकामाचं नेतृत्व करणारे मुख्य मुख्य पुरातत्त्ववेत्ते होते. त्यांनी सांगितले नव्या ठिकाणी सापलेल्या वास्तुकलेची बनावट ही धोलावीराशी मिळतीजुळती आहे.
अजय यादव यांनी या शोधाबाबत माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला या जागेकडे मोठमोठ्या दगडांचा ढीग समजून दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र येथील ग्रामस्थांना इथे एखादा मध्ययुगीन किल्ला किंवा दडलेला खजिना असावा, असं वाटायचं. मात्र आम्ही याची तपासणी केली तेव्हा येथे हडप्पाकालीन वस्ती सापडली. इथे सुमारे ४ हजार ५०० वर्षांपूर्वी लोक राहायचे. या जागेची औपचारिक ओळख ही जानेवारी महिन्यात झाली आहे. या जागेचं नामकरण मोरोधारो असं करण्यात आलं आहे.
अजय यादव यांच्या मते खोदकामामधून बरीच हडप्पाकालीन भांडी सापडली आहेत. ती धोलावीरा येथे सापडणाऱ्या वस्तूंशी मिळतीजुळती आहेत. ही वस्ती हडप्पा कालाच्या उत्तरार्धातील असल्याचा अंदाज आहे. पुरातत्त्ववेत्त्यांनी सांगितले की, सखोल अभ्यास आणि खोदकामामधून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आम्हाला लागलेल्या महत्त्वाच्या शोधापैकी एक म्हणजे मोरोधारो आणि धोलावीरा हे दोन्हीही समुद्रावर अवलंबून होते. मात्र वाळवंटापासून जवळ असल्याने पुढे या भागाचंही वाळवंटीकरण झालं असावं.