अयोध्येबाहेरील मशिदीला हिंदूंचाही मिळतोय पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:12 AM2020-08-14T02:12:28+5:302020-08-14T06:45:50+5:30
सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने व्यक्त केले समाधान
लखनौ : उत्तर प्रदेशात पाच एकर पर्यायी जागेवर बांधण्यात येत असलेल्या मशिदीस हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने म्हटले आहे. या पाठिंब्याबाबत बोर्डाने समाधानही व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उत्तर प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाला अयोध्येबाहेर धन्नीपूर येथे पाच एकर जमीन २ आॅगस्ट रोजी हस्तांतरित केली. या जमिनीवर मशीद बांधण्यासाठी वक्फ बोर्डाने १५ सदस्यीय इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. फाऊंडेशनचे प्रवक्ते अथर हुसैन यांनी सांगितले की, आम्हाला संपूर्ण जगातून जो प्रतिसाद मिळत आहे, त्याने आम्ही भारावलो आहोत. आम्हाला फोन करणाऱ्यांत ६0 टक्के लोक हिंदू आहेत.
मशिदीसोबत रुग्णालय बांधणार
या जागेवर आम्ही मशिदीबरोबरच एक भव्य रुग्णालय एक कम्युनिटी किचन आणि एक शैक्षणिक संस्था उभारणार आहोत.
लोक आम्हाला देणग्या देण्यास उत्सुक आहेत. संस्थेने लखनौमध्ये कार्यालय उघडले असून, विदेशी देणगी मिळविण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. दोन बँक खाती उघडण्यात आली आहेत.