'प्लीज माझ्या मुलांना वाचवा...' अशी याचना बुलंदशहरातील एक आई आपल्या दोन चिमुकल्या मुलांसाठी सर्वांकडे करत आहे. कोमल यांची अर्णव आणि कुणाल ही दोन मुलं सध्या अशा एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत की ज्यावरील उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. साडेतीन वर्षांचा अर्णव आणि दीड वर्षांचा कुणाल एमपीएस II हंटर सिंड्रोम नावाच्या घातक आजाराने ग्रस्त आहेत. या दोन निष्पापांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी या कुटुंबाला २ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचं सांगितलं आहे. अशा परिस्थितीत हे असहाय कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लोकांकडे मदतीची याचना करत आहेत.
नशिबानं अर्णव आणि कुणालसोबत काय खेळ केलाय याची त्यांना देखील कल्पना नाही. एमपीएस II, हंटर सिंड्रोम हा घातक आजार नेमका काय आहे हे त्यांना माहित नाही. त्यावर कसं नियंत्रण मिळवायचं हे देखील त्यांच्या समजण्यापलिकडे आहे. सुरुवातीच्या काळात ते निरागसपणे बोलायचे आणि चालायचे, पण आता त्यांना बोलता येत नाही आणि त्यांचे हात पायही पूर्ण काम करत नाहीत. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू न झाल्यास त्यांच्या जीवालाही धोका असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
दोन्ही निष्पाप बालकांचा जन्म सिकंदराबादच्या गेसपूर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरीश हे मुरादाबादमध्ये यूपी पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मुलांच्या आजारपणामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब तणावात आहे. "जन्मानंतर एक वर्षानंतर मोठा मुलगा अर्णवसाठी समस्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे अर्णवला बुलंदशहर आणि इतर मोठ्या शहरांतील बालरोगतज्ज्ञांना दाखवण्यात आलं. याच दरम्यान धाकटा मुलगा कुणालचाही जन्म झाला. जन्मापासून बरोबर एक वर्ष तो बरा होता, पण त्यानंतर तो खूप आजारी पडला", असं आई कोमल सांगते.
दर आठवड्याला द्यावं लागतं दीड लाखाचं इंजेक्शनडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हे कुटुंब वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बराच शोध घेतल्यानंतर दिल्ली एम्समध्ये पोहोचले, जिथं त्यांना समजले की आपली मुलं एमपीएस II, हंटर सिंड्रोम नावाच्या आजारानं ग्रस्त आहेत. या दोन निष्पापांना दर आठवड्याला जे इंजेक्शन दिलं जातं, त्या एका इंजेक्शनची किंमत दीड लाख रुपये असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. दीड लाखांचं हे इंजेक्शन अर्णवला दोन वर्षांसाठी दर आठवड्याला दिलं जाणार आहे, तर कुणालला एका वर्षासाठी म्हणजेच त्याच्या उपचाराचा एकूण खर्च २ कोटी ३४ लाख असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
कुटुंब आर्थिक विवंचनेत, मदतीची मागणीआईनं आपल्या मुलांच्या उपचारासाठी सरकार, सामाजिक संस्था आणि सामान्य लोकांकडे मदतीची याचना केली आहे. त्याचवेळी त्यांची वृद्ध आजीचं अश्रू काही केल्या थांबताना दिसत नाहीत. आपल्या असहायतेची कहाणी सांगताना आजी विमला खूप भावूक झाल्या. पती आणि मोठा मुलगा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करत करतात. २०१६ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा प्रचंड मेहनत करून पोलिसात दाखल झाला, मात्र त्यानंतर जन्मलेल्या अर्णव आणि कुणालच्या गंभीर आजारानं त्यांच्या कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकलं आहे. उपचारासाठी वडिलोपार्जित घर विकलं तरी मुलांवर उपचार करणं अशक्य असल्याचं आईचं म्हणणं आहे.
जर त्यांनी मुलांवर लवकर उपचार सुरू केले नाहीत तर काही दिवसांनी ही मुलं त्यांचं वजन सहन करू शकणार नाहीत, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. उपचाराशिवाय त्यांचं जगणंही कठीण आहे. उपचाराचा एकूण खर्च दोन कोटी ३४ लाख रुपये आहे. तर सरासरी कुटुंबाला उपचार सुरू करण्यासाठी दर आठवड्याला तीन लाखांपेक्षा जास्त रुपये लागतील. अशा परिस्थितीत हे कुटुंब सरकार आणि लोकांकडून मदतीची याचना करत आहे.