मुलगा दिव्यांग जन्माला आल्याने आईने नवजात अर्भकाला दूध पाजण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 02:57 PM2018-02-13T14:57:42+5:302018-02-13T14:58:36+5:30
मुलगा दिव्यांग जन्माला आल्याने आईनेच त्याला स्वतःपासून दूर केलं.
बंगळुरू- कर्नाटकच्या चिकबल्लापूर जिल्ह्यात ह्रदयस्पर्शी घटना घडली आहे. तेथिल एका आईने आपल्याच मुलाला दूध पाजायला नकार दिला. मुलगा दिव्यांग जन्माला आल्याने आईनेच त्याला स्वतःपासून दूर केलं. आता त्या चिमुरड्याची काळजी तेथिल एक एनजीओकडून घेतली जाते आहे. स्थानिक सरकारने या चिमुरड्याची जबाबदारी एका एनजीओला दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकबल्लापूर जिल्ह्यातील एका माहिलेने जिल्हा हॉस्पिटलमध्ये 8 फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या पाच दिवसानंतर तो दिव्यांग असल्याचं त्याच्या आईला समजलं. दिव्यांग मूल जन्माला आल्याने त्याचा सांभाळ करणार नसल्याचं आईला डॉक्टरांना सांगितलं. तसंच त्याला दूध पाजणार नसल्याचंही सांगितलं. महिलेच्या या वागणुकीनंतर हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ जिल्हा प्रशासनाला या संदर्भातील माहिती दिली. हॉस्पिटलमधील माहितीनंतर महिला व बाल कल्याण विभागाचं एक पथक घटनास्थळी पोहचलं.
महिलेच्या या निर्णयावर डॉक्टर व प्रशासकिय अधिकाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रय्तन केला पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. जिल्हा बाल विकास अधिकारी लक्ष्मीदेवाम्मा यांच्या माहितीनुसार, महिलेला अनेकदा समजावूनही तिने ऐकलं नसल्याने बाळाची जबाबदारी एनजीओला देण्याचा निर्णय घेतला.
सरकारच्या बाल संरक्षण योजनेअंतर्गत मुलाला पुढील तीन महिन्यासाठी मातृछाया या एनजीओमध्ये पाठविण्यात आलं आहे. नवजात बाळाचे पाय सरासरीपेक्षा मोठे होते. त्यावर उपचार होऊ शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं, असं जिल्हा हॉस्पिटलमधील चिकित्सकांनी सांगितलं.