बंगळुरूमधील दुसरीतील एका विद्यार्थ्याने पंतप्रधाननरेंद्र मोदींना लिहिलेलं एक भावूक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांची आई हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याला आता पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं आहे. आरुष श्रीवत्स या विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्या आईच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं.
या पत्रात आरुष श्रीवत्स याने लिहिलं की, तुमची आई श्रीमती हिराबेन यांचं निधन झाल्याचं वृत्त टीव्हीवर पाहून मला दु:ख झालं. कृपया माझ्या संवेदनांचा स्वीकार करा. मी त्यांच्या आत्म्याला परमेश्वरचरणी स्थान मिळण्यासाठी प्रार्थना करतो. ओम शांती. पंतप्रधान मोदींनी आरुष श्रीवत्स याने व्यक्त केलेल्या संवेदनांसाठी त्याचे आभार मानले आहेत. तसेच अशा प्रकारच्या संवेदनांमुळे मला आईपासून दुर झाल्यावर बळ देतात, असे सांगितले.
या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं की, माझ्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आईचं निधन हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. तसेच त्याच्या वेदना शब्दात व्यक्त करण्यापलिकडच्या आहेत. मला तुमच्या विचार आणि प्रार्थनांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अशा प्रकारचा जेस्चर मला अशा प्रकारचे नुकसान सहन करण्याची शक्ती आणि साहस प्रदान करते.
ही दोन्ही पत्रं आता भाजपाच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. याबाबतच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, हेच खऱ्या स्टेटसमनचं वैशिष्ट्य आहे. माननीय पंतप्रधान दुसरीतीली विद्यार्थ्याच्या शोकसंदेशाला उत्तर देतात. हे जीवनाला बदलणारे संकेत आहेत. ते या तरुणाला जीवनात योग्य दिशेने घेऊन जातील.