Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:46 AM2021-05-20T10:46:53+5:302021-05-20T10:50:20+5:30
Mucormycosis: देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे म्युकरोमायसीस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. (mucormycosis black fungus patient increased in delhi rajasthan and maharashtra)
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच या आजारामुळे होणारे मृत्यूही वाढत आहेत. महाराष्ट्रात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!
उत्तर भारतात प्रमाण वाढले
केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशाच्या विविध राज्यांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमध्ये या आजाराचा धोका वाढताना दिसत आहे. राजस्थानमध्ये तर या आजाराला महामारी घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे या आजाराचे ५० रुग्ण आढळून आले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मेरठमध्ये ४२ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तेलंगण राज्याने एक नोटिफिकेशन जारी केले असून, सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
“नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा
महाराष्ट्रात सर्वाधिक लागण
सर्वाधिक कोरोनाबाधित आणि कोरोनाच्या मृत्यूनंतर आता काळ्या बुरशीच्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे. या आजारामुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दीड हजार रुग्णांना या आजाराची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक १५० रुग्ण आढळून आले असून, १० ते १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या आजाराची लक्षणे उशिराने दिसून येत असल्यामुळे उपचार होण्यासही विलंब होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.