रिलायन्सच्या सामूहिक व्यवस्थापनासाठी मुकेश अंबानी करणार ‘फॅमिली कौन्सिल’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:07 AM2020-08-15T03:07:13+5:302020-08-15T03:07:34+5:30
कुटुंबाच्या वारस नियोजनाची प्रक्रिया पुढील वर्षी पूर्णत्वाची अपेक्षा
मुंबई : जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (६३) हे अंबानी कुटुंबाच्या विस्तारत चाललेल्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सामूहिकरीत्या पार पाडली जावी यासाठी ‘फॅमिली कौन्सिल’ (कुटुंब परिषद) स्थापन करत आहेत. ही कॉन्सिल म्हणजे अंबानी कुटुंबाच्या वारस नियोजनाची प्रक्रियाच आहे, असे सूत्रांनी सांगितले. कॉन्सिल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) सूत्रे हाती घेण्याची अपेक्षा असलेल्या
मुकेश अंबानी यांची मुले आकाश, इशा आणि अनंत यांच्यासह कुटंबाच्या सर्व प्रौढ सदस्यांना समसमान प्रतिनिधित्व देईल. कॉन्सिलमध्ये कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती, सन्मित्र आणि सल्लागार म्हणून बाहेरील व्यक्तीही बहुधा घेतल्या जातील. कॉन्सिल आरआयएलच्या निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.
मुकेश अंबानी हे ही वारसाची नियोजन प्रक्रिया पुढील वर्षाच्या अखेपर्यंत करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ८० अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त संपत्तीचे मालक असलेले अंबानी यांना आरआयएलच्या भवितव्याबाबत कुटुंबात समसमान दृष्टिकोन असावा व जर संघर्ष उद््भवलाच तर कंपनीची सूत्रे पुढील पिढी हाती घेईल तेव्हा तो सोडवण्यासाठी एकसमान व्यासपीठ असलेच पाहिजे, असे वाटते.
अपेक्षा अशी आहे की, अंबानी यांची तीन मुले आरआयएलमधील वेगवेगळ््या विभागांचे (उदा. रिटेल, डिजिटल आणि उर्जा) प्रमुख असतील. सामुहिक ताकद कायम राखली जाईल याची खात्री ही फॅमिली कॉन्सिल करेल.
2014 आॅक्टोबरमध्ये आकाश आणि इशा अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडच्या मंडळात संचालक आले. अनंत यांची नियुक्ती जिओ प्लॅटफॉर्म्सवर मार्च महिन्यात अतिरिक्त संचालक म्हणून केली गेली. इशा अंबानी या रिलायन्स फौंडेशन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अँड रिसर्चच्याही संचालक आहेत. आकाश आणि इशा हे जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मंडळावरही आहेत.