नवी दिल्ली: महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन शंकराची पूजा केल्यामुळे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेशातील एका मौलवीने टीका केली आहे. नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणे पूर्णपणे अयोग्य आहे. या कृतीनंतर त्यांनी हदयावर हात ठेवून सांगावे की, ते अल्लाहला याचे काय उत्तर देणार आहेत? आमच्या धर्मानुसार एखाद्या व्यक्तीने विशिष्ट देवतेची पूजा केली तर तो व्यक्ती त्या धर्माचा होतो. नक्वींच्या मनात एक आहे आणि ते करतात एक. हिंदुंनी नमाजपठण न करता किंवा मुस्लिमांनी मंदिरात न जाताही दोन्ही धर्मांमधील बंधुभाव जोपासणे शक्य आहे. धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करताही एखाद्या धर्माबाबत आपुलकी दाखवता येऊ शकते. मात्र, मुस्लीम व्यक्तीने मंदिरात जाऊन शंकराची पूजा करणे, हे इस्लामविरोधी आहे. नक्वी अशाचप्रकारे हिंदू- मुस्लिमांमधील बंधूभाव वाढवणार आहेत का?, असा सवाल सहारनपूरच्या मदरसा दारुल उलूम अशरफियाचे मौलाना सलिम अश्रफ कासमी यांनी केला. नक्वी सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त रामपूर येथील बागेश्वर शिव मंदिरात गेले होते. त्यावेळी नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेकही केला. या सगळ्याची छायाचित्रे नक्वी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली होती. यावेळी त्यांनी धार्मिक सद्भावनेसाठी सर्व धर्मांचा आदर करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. रामपूरच्या बागेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीचा उत्सव हा देशाच्या सांस्कृतिक आणि सद्भावनेचे प्रतिक आहे, असे नक्वी यांनी सांगितले होते.
शंकराची पूजा केलीत, आता अल्लाहला काय उत्तर द्याल; उलेमाचा नक्वींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:10 AM