नवी दिल्ली, दि. 14 - देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील उपस्थित होते. यावेळी, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानकडून करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आभार मानले. बुलेट ट्रेनमुळे देशाच्या विकासाचा वेग वाढेल, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले.
जाणून घेऊया मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे.
2. या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.
3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल.
4. तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल
5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे.
6. 1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे.
7. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील.
8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.
9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे.
10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.