...अखेर मुंबईला मिळाला सर्वाधिक खड्ड्यांच्या शहराचा 'मान'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 04:54 PM2018-11-17T16:54:18+5:302018-11-17T16:57:29+5:30
रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार विभागाचे सचिव नवीन लाडे यांनी खड्डे मोजण्याचा अनोखा उपक्रम राबवला होता.
मुंबई- पावसाळ्यात मुंबईत जागोजागी खड्डेचखड्डे असतात. त्यामुळे वाहन चालकांसह सामान्यांना या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागतो. या खड्ड्यांना वैतागूनच रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार विभागाचे सचिव नवीन लाडे यांनी खड्डे मोजण्याचा अनोखा उपक्रम राबवला होता. त्यांच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं नोंद घेतली आहे. नवीन लाडे यांना सुवर्णाक्षरांत कोरलेलं प्रमाणपत्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून देण्यात आलं आहे. परंतु त्यांनी मुंबई शहर खड्डेमय असल्याचा केलेला दावा गिनीज बुकसह लिम्का बुकनं फेटाळून लावला आहे.
नवीन लाडे आणि त्यांच्या टीमला मुंबई शहरात 26 हजार 934 खड्डे आढळले होते. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांच्याकडून खड्ड्यांची मोजणी सुरू होती. शहरातील किमान 20 हजार खड्डे शोधण्याचा लाडे यांचा प्रयत्न होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना शहरात त्यापेक्षा जास्त खड्डे आढळून आले होते. यानंतर त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याशी संपर्क साधला होता. सर्वाधिक खड्डे असलेलं शहर असा विक्रम मुंबईच्या नावे नोंदला जावा, यासाठी लाडे प्रयत्नशील होते.
गिनीज बुक ऑफ रेकॉड्सकडून लाडे यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. लाडे यांचा प्रयत्न राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉड्सच्या प्रशासनानं म्हटलं आहे. इतर शहरांमधील खड्ड्यांची आकडेवारी नसल्यानं मुंबईला हा 'मान' कसा द्यायचा, असाही प्रश्न गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून विचारण्यात आला होता. तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं अशा कोणत्या प्रकारची वर्गवारी करणाचा विभाग आमच्याकडे नसल्याचं कारण दिलं आहे. एकाच खड्ड्याची नोंद दोनदा होऊ नये, यासाठी लाडे यांच्या टीमकडून खड्ड्यांचं जिओ टॅगिंगदेखील करण्यात आलं होतं. यासाठी 4 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता.