मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध; दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 04:31 AM2019-11-17T04:31:00+5:302019-11-17T06:22:25+5:30
दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) २० राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.
मुंबईत नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांत दोष नसल्याचे आढळून आले आहे. २१ मोठ्या शहरांतील पाण्याच्या शुद्धतेत मुंबई पहिल्या स्थानी आहे. मुंबईतील पाण्याचे सर्व दहा नमुने तपासणीत उत्तीर्ण झाले आहेत. चंदीगडमधील पाण्यात अॅल्युमिनियम आणि क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. पासवान म्हणाले की, २१ शहरांतील पाण्याचे १० नमुने तपासणीस पाठवले होते. त्यात दिल्लीचे सर्व नमुने ४२ पैकी १९ मानकांवर नापास झाले. दिल्लीच्या पाण्यात आर्सेनिक, क्लोराईड, टीडीएस, रंग, अमोनिया, सल्फाईड, अॅनियोनिक डिटर्जंट, लीड, मॅग्नेशियम, कॅल्शिअम नायट्रेट, अॅल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक आढळून आले. महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सहाव्या स्थानी असून, तेथील १० पैकी ६ नमुने नापास झाले. त्यांच्यात ७ मानकांत दोष आढळून आले. पासवान म्हणाले की, आमचा उद्देश कोणत्याही सरकारला दोष देणे हा नाही, हे दिल्ली सरकारला दाखवून देण्यासाठी देशभर सर्वेक्षण केले. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे स्वच्छ पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. १०० स्मार्ट शहरांतही पाण्याची तपासणी केली जात आहे.
पाणीशुद्धतेत शहरांचे मानांकन
१ मुंबई । २ हैदराबाद । ३ भुवनेश्वर । ४ रांची । ५ रायपूर
६ अमरावती । ७ सिमला । ८ चंदीगड । ९ तिरुवनंतपूरम
१० पाटणा । ११ भोपाळ । १२ गुवाहाटी । १३ बंगळुरू
१४ गांधीनगर । १५ लखनौ । १६ जम्मू । १७ जयपूर
१८ देहरादून । १९ चेन्नई । २० कोलकता । २१ दिल्ली