नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटांत मंगळवारी हाणामारी झाली होती. यामध्ये पाच पैलवानांना गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी सागर नावाच्या २३ वर्षीय पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सुशील कुमारसह पाच जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.एफआयआरमध्ये सुशील कुमारचेही नाव असल्याने त्याच्यासह अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस छापेमारी करीत आहेत. सुशील कुमार सापडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मृतकाचे वडील दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल आहेत.
दोन गटांमध्ये तुफान हाणामारीमृत सागर हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील एका घरात भाड्याने राहत होता. हे घर सुशीलच्या मालकीचे आहे. घर रिकामे करण्यावरून वाद होता. मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून स्कॉर्पिओ कार आणि पिस्तूल ताब्यात घेतले. जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.
सुशील कुमार म्हणतो...‘ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की, काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या परिसरात शिरकाव करीत भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही’.
कोण आहे सुशील?सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव मल्ल आहे. ३७ वर्षीय सुशील कुमारने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि त्याआधी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याला २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आले होते.