महाराजगंज: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निकाहादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण टोकाला गेल्यानं अखेर ते पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आणि धक्कादाय प्रकार उघडकीस आला. मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाचे काही उर्दू उच्चार चुकले. त्यामुळे उपस्थितांना शंका आली. त्यानंतर नवरदेवाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे नवरदेवाचं पितळ उघडं पडलं.
नवरदेवाची पोलखोल होताच मुलीकडच्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलासोबत आलेल्या काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून मुलगा मुलीच्या घरी येत होता. मात्र या दोन वर्षांत कोणालाही त्याचा संशय आला नाही. निकाह लागण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्याचं पितळं उघडं पडलं.
कोल्हुई परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचं सिद्धार्थनगरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम जडलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यांचा दररोज एकमेकांशी संवाद होऊ लागला. मुलगा मुलीच्या घरी यायचा. तिच्या कुटुंबियांशी त्याची ओळख झाली. घरच्यांच्या संमतीनं निकाहाची तारीख ठरली. तरुणीला तरुणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मात्र कुटुंबीय नकार देतील या भीतीनं तिनं त्या गोष्टी लपवल्या.
निकाहाचा दिवस नक्की झाला. लॉकडाऊन असल्यानं कुटुंबीय येऊ शकणार नाहीत. केवळ माझे मित्र येतील, असं तरुणानं मुलीच्या कुटुंबाला सांगितलं होतं. निकाह सुरू असताना तरुण उर्दू शब्द बोलताना अडखळला. त्यामुळे मौलवीला शंका आली. मुलीकडच्यांनी मुलाची चौकशी सुरू केली. त्या दरम्यान तरुणाचं पाकिट तपासलं. त्यात पॅन कार्ड होतं. त्यावर तरुणाचाच फोटो होता. मात्र नाव दुसऱ्याच धर्माचं होतं. त्यामुळे एकच गोंधळ झाला. मुलीकडच्यांनी मुलाला मारहाण केली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. यानंतरही मुलगी निकाह करण्यावर ठाम असून तिचे कुटुंबीय मात्र विरोधात आहेत. तर मुलाच्या कुटुंबियांनी निकाहाबद्दल कोणतीही कल्पना नाही.