मुस्लिम समाज राजकीय आधाराच्या शोधात; भाजपाविषयी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:29 AM2018-12-06T05:29:21+5:302018-12-06T05:29:32+5:30

राजस्थानात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी सुरु आहे.

Muslim community in search of political support; Angry about BJP | मुस्लिम समाज राजकीय आधाराच्या शोधात; भाजपाविषयी नाराजी

मुस्लिम समाज राजकीय आधाराच्या शोधात; भाजपाविषयी नाराजी

Next

- सुहास शेलार
जयपूर : राजस्थानात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी सुरु आहे. जाती, धर्माच्या मुद्यांवरून रणकंदन सुरु आहे. काँग्रेस-भाजपाचे बडे नेते प्रचार सभांमधून एकमेकांना धर्माच्या (हिंदुत्वाच्या) व्याख्या शिकवत आहेत. मात्र, या सगळ्यात मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरून मुस्लिमांचे प्रश्न, त्यांच्या समस्या मांडल्या गेल्या नाहीत किंवा त्यांच्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे मतदान कोणाला करावे आणि कोणत्या आधारावर करावे, हा प्रश्न राजस्थानातील मुस्लिमांपुढे आहे.
राजस्थानात अल्पसंख्यांक समुदाय सुरुवातीपासूनच भाजपाच्या विरोधात होता. त्याचे पडसाद भाजपाच्या उमेदवारी यादीत नेहमीच दिसत आहेत. यंदा भाजपाने शेवटच्या क्षणाला एकमेव मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवला. तोही काँग्रेसच्या सचिन पायलट यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केवळ मुस्लीमबहुल मतदारसंघात प्रचार करताना गोहत्या, प्रखर हिंदुत्व, लव-जिहाद यांसारख्या मुद्द्यांवरून मुस्लीम विरोधी जनभावना निर्माण केली. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न उघड होता. त्यामुळे मुस्लीम समाजाची भाजपावरील नाराजी कायम आहे.
काँग्रेसनेही राजस्थानात मुस्लीम समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांनी सुरुवातीला अजमेरच्या मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्याला भेट दिली, तिथे चादर चढवली, अलवर येथील दर्ग्याचेही त्यांनी दर्शन घेतले. मात्र राम मंदिरावरून हिंदू समाज आक्रमक होत असताना, मुस्लिमांच्या फार जवळ जाऊन हिंदुंचा रोष ओढवून घेणे परवडणारे नाही, हे ओळखून त्यांनीही हिंदुत्वाचे वस्त्र पांघरले. तब्बल ८८.४९ टक्के हिंदु लोकसंख्या असलेल्या राजस्थानात केवळ ९.०७ टक्के मुस्लीम आहेत (आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार); आणि मुस्लिमांच्या मतांच्या आधारे सत्ता गाठणे अशक्यप्राय आहे. त्याचाही हा परिणाम असावा.
राजस्थानात सत्तेचे मुख्य दावेदार असलेले दोन्ही पक्ष आपल्या पाठीशी नसलेले पाहून मुस्लीम समाज अस्वस्थ आहे. मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या प्रभागांत काँग्रेसने १५ उमेदवार उभे केले आहे. मात्र, त्यांच्यापैकी कितीजण निवडून येतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याविरोधात अपक्ष आणि स्थानिक पक्षांचे मिळून ३८२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी १२५ उमेदवार मुस्लीम आहेत. परिणामी मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊन तेथे हिंदू उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचे अंदाज मांडले जात आहेत.
>...तर, दुसरा सर्जिकल स्ट्राईक करू
पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मुहम्मह’चा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरप्रश्नी दिलेल्या धमकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले. राजस्थानातील विजयनगर येथे सभेत ते म्हणाले की, मसूद अजहरने असे काही दृष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासह संपूर्ण पाकिस्तानातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आम्ही दुसरा सर्जिकल स्ट्राइक करू’. मसूद अजहरच्या धमकीमुळे भाजपा व योगी आदित्यनाथ यांना राम मंदिरांचा मुद्दा पुन्हा प्रचारात आणणे सोपेच झाले.

Web Title: Muslim community in search of political support; Angry about BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.