माणुसकीचा धर्म! हनुमान मंदिरासाठी मुस्लीम व्यक्तीने दान केली कोट्यवधींची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 02:07 PM2020-12-09T14:07:32+5:302020-12-09T14:07:47+5:30
Hanuman Temple : एका मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आपली जवळपास एक कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये धार्मिक एकात्मतेचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. एका मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आपली जवळपास एक कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. छोट्या मंदिरात पूजा-अर्चना करताना जमा होणाऱ्या भाविकांना गर्दीचा सामना करावा लागत होता. मात्र आता लवकरच मुस्लीम व्यक्तीने दान केलेल्या जमिनीवर हनुमानाचं मोठं मंदिर उभारण्यात येणार आहे. एच. एम. जी. बाशा असं या दानशूर व्यक्तीचं नाव असून त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
65 वर्षीय एचएमजी बाशा हे कार्गोचा व्यापार करतात. काडूगोडी भागात त्यांचं घर आहे. बंगळुरूच्या मायलापुरा भागात त्यांची जवळपास तीन एकर जमीन आहे. या जमिनीजवळ हनुमानाचं एक मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. लोकांच्या मान्यतेनुसार हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्यामुळे शेकडो भाविक या मंदिरात पूजा-अर्चनेसाठी दाखल होतात. मंदिर अगदीच लहान असल्यानं भाविकांना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो.
मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी योजना तयार आली होती. मात्र समितीकडे जमीन नव्हती. मंदिराच्या आसपासची जमिनी बाशा यांच्या मालकीची होती. बाशा यांना भाविकांची अडचण लक्षात येताच त्यांनी आपल्या मालकीची जमीन मंदिरासाठी दान करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच यासंदर्भात मंदिर समितीशीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
जमीन बंगळुरूच्या ओल्ड मद्रास रोडवर आहे. ही अतिशय मोक्याची जागा असून सध्या या जमिनीची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे बाशा यांच्या दानशूरपणाचं कौतुक होतं आहे. बाशा यांचं कौतुक करणारे होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर मंदिर परिसरात आणि इतरत्र लावण्यात आले आहेत. जमीन मिळाल्यानंतर श्री वीरांजनेयास्वामी देवालय सेवा ट्रस्टच्यावतीनं मंदिराच्या विस्ताराचं काम सुरू करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"काँग्रेससोबत युती करून चूक केली, जनतेच्या विश्वासाला तडा गेला; सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवलं"https://t.co/ZKzaqGFjqT#HDKumaraswamy#Siddaramaiah#Congress#BJP#Karnatakapic.twitter.com/lmxESTlQqJ
— Lokmat (@MiLOKMAT) December 6, 2020