बंगळुरू - कर्नाटकातील हिजाब वाद अद्याप पूर्णपणे मिटला नसताना आणखी एक धार्मिक वाद निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. सीमा भागातील कर्नाटकात काही लोकांना वादग्रस्त बॅनरबाजी करत मंदिर परिसरातील यात्रांमध्ये मुस्लीम दुकानांना बंदी घालण्याची मागणी केली आहे. दक्षिणपंथी हिंदू समुहाचे हे लोक असल्याचं सांगण्यात येत आहे. या गटाने केलेल्या विरोधातील मागणीसमोर येथील यात्रा समितीनेही गुडघे टेकल्याचं दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाच्या हिजाबसंदर्भातील निर्णयानंतर मुस्लीम संघटनांनी आपलं दुकान बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच, मंदिरांसमोरील वार्षिक यात्रेत या दुकानांना स्टॉल लावण्यास परवानगी देऊ नये, दक्षिणपंथी हिंदू संघटनांनी म्हटले आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात काही ठिकाणी हे वादग्रस्त बॅनर झळकले आहेत. त्यावर, जे लोक कायद्याचा सन्मान करत नाहीत, त्यांना येथे व्यापार करण्यास परवानगी देता कामा नये, आम्ही ज्या गाईंची पूजा करतो, ते लोक या गायींची कत्तल करतात, असा आशय या बॅनरवर लिहिला आहे.
राज्यातील सीमा भागात मंदिरांचे वार्षिक उत्सव आणि यात्रांचे नियोजन, मेळावे हे एप्रिल आणि मे महिन्यातच होतात. याद्वारे कोट्यवधी रुपयांचा करही जमा होतो. धार्मिक तेढ निर्माण झाल्याव्यतीरिक्त यापूर्वी कधीच, अशा पद्धतीने यात्रांमध्ये व्यापारास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुस्लीम व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्यानंतर, मंदिरातील उत्सावांत मुस्लीमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
20 एप्रिल रोजी होणाऱ्या लिलावांत मुस्लिंमांना बंदी
20 एप्रिल रोजी महालिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या आयोजकांनी या लिलावात मुस्लीमांना सहभागी होण्यास मनाई केली आहे. आयोजकांनी 31 मार्च रोजी होणाऱ्या लिलावासाठी केवळ हिंदूंच भाग घेण्यासाठी पात्र आहेत, असेही स्पष्ट केले आहे.