पुरुलिया (प. बंगाल) - रामनवमीच्या मिरवणुकीवरून पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराची धग शमलेली नसतानाच एका मुस्लीम व्यापा-याने स्वखर्चाने हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून सांप्रदायिक सलोख्याचे स्तुत्य उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे.सांप्रदायिक कलहाची ठिणगी पडलेल्या पुरुलिया शहराच्या कर्पूर बागान भागातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार मोहम्मद पप्पू या मुस्लीम व्यावसायिकाने केला. डागडुजी, रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने रूपडे पालटलेल्या या मंदिराचे उद््घाटन हनुमान जयंतीच्या दिवशी शनिवारी झाले. त्यावेळी मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला पप्पूच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला.वयाची जेमतेम विशी पार केलेला मोहम्मद पप्पू हा मंडप डेकोरेटर व लाऊडस्पीकर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. त्याचे बालपण मंदिरासमोर खेळण्यात गेले. जुनाट, पडायला आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे त्याच्या मनात होते. त्यासाठी त्याने पैसेही साठविले होते. पण मुस्लीम असल्याने आपल्याला असे करू दिले जाईल का, ही शंका मनात होती. परंतु स्थानिकांनी त्याला होकार दिला, त्याची वाहवाही केली. पप्पूने तीन महिने खपून व स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. (वृत्तसंस्था)पुरुलिया शहरापासून ३० किमीवरील गावात रामनवमीची मिरवणूक मशिदीसमोरून नेण्यावरून झालेल्या दंगलीत शेख शहाजहान या ५० वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर सांप्रदायिक विद्वेशाची झळ राज्याच्या इतर भागांतही पोहोचली होती.पप्पूने केलेल्या या कामातून बंगालची धार्मिक सलोख्याची खरी सांस्कृतिक परंपराच दिसून येते.-शमीम दाद खान, पुरुलियाचे नगराध्यक्षमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे पप्पूच्या फार दिवसांपासून मनात होते. त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्याच्या हातून हे चांगले काम घडले याचा आनंद आहे.- राजाराम राम, मोहम्मद पप्पूचा बालमित्र
मुस्लीम व्यापाऱ्याने केला हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, मोहम्मद पप्पू या तरुणाने घालून दिला आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:27 AM