आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातून लोकांना संदेश पाठवला आहे. "माझं नाव अरविंद केजरीवाल आहे, मी दहशतवादी नाही" असं त्यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही अरविंद केजरीवाल यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवत आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का? अरविंद केजरीवाल आणि त्यांचं कुटुंब, मुलांची भेट ही काचेच्या भिंतीतून केली जात आहे."
"पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस सुरक्षा आहे, ते केजरीवाल यांना भेटले तेव्हा त्यांच्यामध्ये काचेची भिंत होती. भाजपाने आपल्या कारवाईतून केजरीवाल यांच्याबद्दल द्वेष असल्याचं स्पष्ट केलं आहे" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
"अरविंद केजरीवाल यांना 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा कट आहे, त्यांच्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कुटुंबाचा अपमान केला जात आहे. हे अरविंद केजरीवाल वेगळ्या मातीचे बनलेले आहेत, त्यांनी आयआरएस सेवा सोडली आहे, तोडण्याच्या प्रयत्नात ते आणखी मजबूत होतील" असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. यानंतर भगवंत मान हे खूप भावूक झाले. मुख्यमंत्री मान म्हणाले की, "दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं भेटू दिलं, ही हुकूमशाही आहे. ही भेट अर्धा तास होती, मनाला खूप वाईट वाटलं. जे हार्ड कोर गुन्हेगार असतात, त्यांच्यासारखी सुविधा देखील केजरीवालांना मिळत नाही. काचेतून मला फोनवर बोलायला लावलं, काचही खराब होती, चेहराही नीट दिसत नव्हता. केजरीवाल हे कट्टर इमानदार आहेत आणि त्यांना अशी वागणूक दिली जात आहे."