बेंगळुरू - भाजपाचे नेते आमच्या आमदारांच्या पत्नींना फोन करून पैसे आणि मंत्रिपदाची ऑफर देत आहेत, घोडेबाजाराला उधाण आलं आहे, असा दावा करणारे काँग्रेस नेते आता तोंडावरच पडलेत. 'वास्तवात असं काही झालंच नव्हतं', असा खुलासा एका काँग्रेस आमदारानंच केल्यानं त्यांची चांगलीच फजिती झालीय आणि भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकातील येल्लापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार शिवराम हेब्बर यांनी पक्षाचं बिंग फोडलंय. कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज माझ्या बायकोचा नव्हता, असं त्यांनी फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. भाजपा नेत्याने माझ्या पत्नीशी संपर्क साधला होता आणि काहीतरी ऑफर दिली होती, अशी बातमी एका वृत्तवाहिनीवरून मला कळली. परंतु, त्या रेकॉर्डिंगमधील आवाज माझ्या पत्नीचा नाही, असं हेब्बर यांनी नमूद केलं आहे. माझ्या पत्नीला कुठल्याही भाजपा नेत्याने फोन केला नव्हता, असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.
कर्नाटक विधानसभेत सत्तास्थापनेचं नाटक भलतंच रंगलं होतं. निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सरकारपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी केली होती. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली होती आणि येडियुरप्पांना परीक्षेआधीच 'पेपर टाकावे' लागले होते. १०४ जागांवरून ११२ वर पोहोचण्यासाठी भाजपा नेते जुळवाजुळव, 'सेटिंग' करत असताना, काँग्रेस-जेडीएसनं त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला होता. आपल्या आमदारांना भाजपानं १०० कोटींची ऑफर दिल्याचा दावा करून जेडीएस नेते कुमारस्वामींनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर, काँग्रेस आमदारांच्या पत्नींना भाजपा नेते फोन करून ऑफर देत असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसनं केला होता. त्यासाठी एक ऑडिओ क्लिपही त्यांनी ऐकवली होती. त्यामुळे भाजपा संशयाच्या फेऱ्यात अडकली होती. बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिल्यानं त्यांची नाचक्की झालीच, पण बदनामीही झाली होती. मात्र, आता शिवराम हेब्बर यांच्या खुलाशाने त्यांच्यावरील हा डाग पुसला जाऊ शकतो.