नाणार प्रकल्प विदर्भात हलविण्याचा विचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:09 AM2018-05-23T00:09:02+5:302018-05-23T00:09:02+5:30
कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही.
नवी दिल्ली : स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारचा प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात हलविण्याबाबत चर्चा झालेली नाही. तसे संकेत राज्य किंवा केंद्र सरकारनेही दिलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती इंडियन आॅइलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी दिली.
ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही. या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. नाणार येथेच प्रकल्प सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. या प्रकल्पात परकीय गुंतवणूक झाली असून अशा वेळी तो अन्यत्र हलविला जाणे शक्य नाही. राज्य सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालयाने दुसरी जागा सुचविल्यास तो तिथे हलविला जाईल का यावर ते म्हणाले की, ते माझ्या अख्यत्यारीत नाही.
भावनेच्या आहारी जाऊन निर्णय नाही
हा प्रकल्प विदर्भामध्ये नेण्यात यावा या मागणीतील भावना सच्ची असू शकते. परंतु नाणारचा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. अशा प्रकल्पाबाबत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येणार नाही. या प्रकल्पाबरोबरच या परिसरात अन्य कोणते उद्योग सुरू करता येतील याचाही विचार झाला आहे.