नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी राम मंदिरासाठी जमीन खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्याबाबत जोरदार टीका केली आहे. आम आदमी पक्षानेही जमीन खरेदीत गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर, सूर्यप्रताप सिंह यांनी म्हटले की, "भगवान श्री राम यांच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा चिंताजनक आहे, राम हे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर उभे असलेल्या व्यक्तीच्या तारणकर्त्याचे नाव आहे. ट्रस्टचे एक विश्वस्त डीएम अयोध्या आणि इतर दोन आयएएस आहेत. ट्रस्टच्या सरचिटणीसकडील आर्थिक अधिकार जप्त करून, सर्व आर्थिक अधिकार दोन जबाबदार लोकांना एकत्रितपणे देण्यात यावेत." सूर्य प्रताप यांच्या ट्विटनंतर काँग्रेसकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही श्री राम मंदिरासाठी जमा केलेल्या निधीत झालेल्या भ्रष्टाचारावरुन भाजपवर टीका केली आहे. कोट्यवधी लोकांनी आस्था आणि भक्तीमार्गाने परमेश्वराच्या चरणी काही दान अर्पण केलं आहे. या निधीचा दुरुपयोग अधर्म आहे, भाविकांच्या आस्थेचा हा मोठा अपमान आहे, असेही प्रियंका गांधींनी म्हटलं. त्यानंतर, आता राहुल गांधींनीही ट्विट करुन प्रियंका यांची री ओढली आहे.
प्रभू श्रीराम हे स्वत: न्याय आहेत, सत्य आहेत, धर्म आहेत. त्यांच्या नावाने धोकेबाजी हा अधर्म आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींनी भाजपवर आणि श्रीराम मंदिर उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर टीका केली आहे.
सूर्यप्रतापसिंह यांनीही केली टीका
सूर्य प्रताप सिंह म्हणाले, रामजन्मभूमीला मिळालेला 1-1 रुपया राम भक्तांचाच आहे, जे त्यांच्या रामाबद्दलच्या अटूट भक्तीचे प्रतीक आहेत. माझा केंद्र सरकारला असा सल्ला आहे की, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून ट्रस्टशी संबंधित सर्व आर्थिक अधिकार यंत्रणेशी संबंधित जबाबदार लोकांना मिळेल, जे रामभक्तांना पूर्णपणे उत्तरदायी असतील. या माजी आयएएस अधिकाऱ्यांने आणखी एक टोला लगावत ट्वीट केले आहे. यामध्ये लिहिले की, ‘मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।’ तसेच, पुढे म्हणाले, 'ट्रस्टने लाखो रामभक्तांचा विश्वास गमावला.'
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राम मंदिर ट्रस्टवर मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की, जी जमीन केवळ 2 कोटी रुपयांना विकली गेली होती, ती जमीन 18.5 कोटीमध्ये विकत घेतली गेली. दुसरीकडे, राम मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी चंपत राय यांनी म्हटले आहे की, या आरोपांमुळे कोणतीही चिंता वाटत नाही. ते म्हणाले की, आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. आम्हाला अशा गोष्टींची पर्वा नाही.