अहमदाबाद: शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचा 100वा वाढदिवस झाला. यानिमित्त मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. मोदींनी या प्रसंगी एक ब्लॉग लिहिला, ज्यामध्ये त्यांनी आईच्या औदार्य आणि काळजीवाहू स्वभावाबद्दल भरभरुन लिहिले. या ब्लॉगमध्ये मोदींनी आपल्या लहानपणीच्या मित्रांबद्दलही लिहीले. यात त्यांनी लहानपणी त्यांच्यासोबत राहणाऱ्या अब्बास या मित्राचा उल्लेख केला. अब्बास आणि मोदी यांचे वडील चांगले मित्र होते.
ब्लॉगमध्ये बालमित्राचा उल्लेखमोदींनी ब्लॉगमध्ये लिहीले की, 'आई हीराबेन यांनी अब्बास यांना अगदी मुलाप्रमाणे वाढवले. अब्बास आणि त्याचे वडील जवळच्या गावात राहत होते. मात्र अब्बासच्या वडिलांचे अकाली निधन झाल्याने माझे वडील अब्बासला घरी घेऊन आले. अब्बास यांनी शिक्षण पूर्ण करेपर्यंत आमच्यासोबतच राहिले.' मोदींच्या ब्लॉगमध्ये अब्बास यांचा उल्लेख केल्यानंतर मीडियामध्ये अब्बास यांचा शोध सुरू झाला. अखेर अब्बास कोण आहे, कुठे राहतात? ही सर्व माहिती बाहेर आली. जाणून घेऊया कोण आहेत अब्बास आणि ते सध्या काय करतात?
अब्बास कुठे आहेत?पीएम मोदींचे बालपणीचे मित्र अब्बास सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे त्यांच्या लहान मुलासोबत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, अब्बास यांना दोन मुले आहेत. धाकटा मुलगा ऑस्ट्रेलिया आणि मोठा मुलगा गुजरातच्या कासिम्पा गावात राहतो. अब्बास हे गुजरात सरकारमध्ये अन्न व पुरवठा विभागात वर्ग 2 चे कर्मचारी होते.
अब्बाससाठी ईदच्या दिवशी आवडीचे पदार्थ बनवत असेपीएम मोदी म्हणाले की, 'ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सणासुदीच्या काळात आजूबाजूची काही मुलंही आमच्या घरी येऊन जेवायची. माझ्या आईच्या हाताने बनवलेला पदार्थ त्यांनाही खूप आवडायचा. आमच्या घराभोवती कोणीही ऋषी-मुनी यायचे तेव्हा आई त्यांना घरी बोलावून खाऊ घालायची. ते जायला निघायचे, तेव्हा आई स्वतःसाठी नाही तर आम्हा भावा-बहिणींसाठी आशीर्वाद मागायची.' नरेंद्र मोदी यांच्या ब्लॉगनंतर आता अब्बास यांची चांगलीच चर्चा होत आहे.