प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या Narendra Giri Death Case) प्रकरणाचे विविध पैलू आता सर्वांसमोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांनी एक स्थानिक भाजपा नेते अनुराग संत(BJP Anuraj Sant) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. त्याशिवाय अन्य एका भाजपा नेते संदीप तिवारी यांच्याशीही बोलणं झालं होतं. अनुराग संत आणि संदीप तिवारी दोघंही महंतांच्या निकटवर्तीय होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांच्या तपासात या दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. महंत यांनी आत्महत्येपूर्वी ६ नंबरवर कॉल केले होते. त्यातील एक हरिद्वारचा आहे. सध्या यासाठी पोलिसांचे पथक हरिद्वारला पाठवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली त्याठिकाणी ६ पानांची सुसाईड नोट आढळली आहे. त्यात मठ आणि आखाडाचे उत्तराधिकारी यांची नावं लिहिली आहेत. या प्रकरणात महंत यांच्या जवळचे आनंद गिरी यांच्याविरोधात FIR नोंदवत हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरु होता. महंत गिरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. महंतांच्या मृतदेहाशेजारी ६ पानी सुसाईड नोट आढळली. त्यासोबत सल्फासच्या गोळ्या सापडल्या. सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप आहे. संपूर्ण आयुष्यात कधीही अंगाला काळा डाग लागू दिला नाही. पण काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दुखी होते.
बऱ्याच काळापासून तणावाखाली होते.
महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे.
शिवसेनेकडून सीबीआय तपासाची मागणी
नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.