नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 जुलै रोजी 4 राज्यांचा दौरा करणार आहेत. या काळात पंतप्रधान मोदी छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानला भेट देतील. पीएम मोदींचा हा दौरा अतिशय वादळी असणार आहे, ज्यामध्ये ते 36 तासांत 5 शहरांमध्ये सुमारे डझनभर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी या 4 राज्यांच्या दौऱ्यात रायपूर, गोरखपूर, वाराणसी, वारंगल आणि बिकानेर येथे जातील आणि 50 हजार कोटी रुपयांच्या सुमारे 50 प्रकल्पांचे लोकार्पण करतील. मोदींचा हा दौरा 7 जुलैपासून सुरू होणार आहे. यात पंतप्रधान दिल्लीहून रायपूरला जातील, तिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यामध्ये रायपूर विशाखापट्टणम कॉरिडॉरच्या सहा-लेनच्या पायाभरणीचा समावेश आहे. यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
गोखपूरमध्ये गीता प्रेसचा कार्यक्रमत्यानंतर पीएम मोदी गोरखपूरला जातील, तिथे ते गीता प्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तेथून ते 3 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही ते करणार आहेत. गोरखपूरहून त्यांच्या मतदारसंघ वाराणसीला जातील, जिथे ते अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तिथे मोदी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते सोन नगर या समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या नवीन मार्गाचे उद्घाटन करतील. याशिवाय ते NH-56 (वाराणसी-जौनपूर) चे चौपदरीकरणाचे उद्घाटनही करतील. मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदीच्या हस्ते होणार आहे.
वाराणसीहून तेलंगणाला रवाना होतील8 जुलै रोजी पीएम मोदी वाराणसी ते तेलंगणातील वारंगल असा प्रवास करणार आहेत. येथे ते नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या प्रमुख भागांसह विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. NH-563 च्या करीमनगर-वारंगल विभागाच्या चौपदरीकरणासाठी पंतप्रधान पायाभरणीही करणार आहेत. यानंतर ते वारंगल येथील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी वारंगलहून बिकानेरला जातील, जिथे ते अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवेच्या विविध भागांचे लोकार्पण करतील. यानंतर ते बिकानेरमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.