नवी दिल्ली - राज्यसभेच्या ऐतिहासिक २५० व्या अधिवेशनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनीसंसदीय परंपराचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसेच संसदीय परंपरांचे पालन करत राज्यसभेत चांगले वर्तन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दल या पक्षांचे मोदींनी कौतुक केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेच्या २०० व्य़ा अधिवेशनाला संबोधित करताना कुणीही आपल्या सेकंड हाऊसला सेकंडरी हाऊस बनवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे आवाहन केले होते. उत्तम संसदीय व्यवहारासाठी आज मी दोन पक्षांचा विशेष कौतुकाने उल्लेख करेन. ते पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजून जनता दल. हे दोन्ही पक्ष संसदीय मर्यांदांचे अतिशय काटेकोरपणे पालन करतात. त्यांचे सदस्य कधीही सभागृहातील वेलमध्ये उतरून गोंधळ घातल नाहीत. तसेच ते आपले प्रश्न अगदी समर्पकपणे उपस्थित करतात. इतर पक्षांनी त्यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे. दरम्यान,महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामो़डींच्या पार्श्वभूमीवरी नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनाच्या या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार बनण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्यासाठी संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. तसेच इतिहास बनवला आहे. एवढेच नाही तर गरज पडल्यावर इतिहास बदलण्यातही यश मिळवले आहे.
स्थायित्व आणि विविधता ही राज्यसभेची दोन वैशिष्ट्ये आहेत. लोकसभा विसर्जित होते, पण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तसेच ती होणारही नाही. येथे राज्यांचे प्रतिनिधित्व निश्चित होते. त्यामुळे येथे विविधता दिसून येते. तसेच निवडणूक प्रक्रियेतून सभागृहात येऊ न शकणाऱ्या गुणवान व्यक्तींना या सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यांचे गुण, अनुभव यांचा देशाला फायदा होतो.
जीएसटी कायदा मंजुरी, तिहेरी तलाक विरोधी कायदा तसेच कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द करण्यासारख्या ऐतिहासिक निर्णयांवेळी राज्यसभेने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती, असेही मोदींनी सांगितले.