नवी दिल्ली- आणीबाणीला 43 वर्षं उलटली असली तरी काँग्रेस सरकारला लागलेला हा डाग अद्यापही लोकांच्या मनात ठसठशीत आहे. सत्ताधारी भाजपानंही आज देशभरात काळा दिवस पाळला आहे. विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीला काळा दिवस संबोधत त्यावर टीकाही केली आहे. आणीबाणीच्या दरम्यान माणसांनाच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवण्यात आलं होतं. आणीबाणी हा देशासाठी काळा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळीच ट्विट करत 1975मधल्या आणीबाणीचा जाहीर निषेध नोंदवला आहे.ट्विटमध्ये ते लिहितात, त्या काळात राजकीय ताकद दाखवण्यासाठी जनतेला नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवण्यात आलं होतं. आणीबाणीचा ज्या महिला-पुरुषांनी विरोध केला त्यांच्या साहसाला माझा सलाम. 43 वर्षापूर्वी लागू केलेली आणीबाणी देश काळा दिवस म्हणून कायम लक्षात ठेवेल. आणीबाणीच्या काळात सर्वच संस्थांचं खच्चीकरण करण्यात आलं असून, भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. त्यावेळीचे वादग्रस्त निर्णय आणि अन्यायकारक आदेशांवर टीका करत मोदींनी लोकशाही मजबूत करण्याचंही जनतेला आवाहन केलं आहे. लिहिणे, चर्चा करणे, विचार व्यक्त करणे, प्रश्न विचारणे हे आपल्या लोकशाहीचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. कोणतीही शक्ती आपल्या संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांना कमी करू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
...त्या काळात माणसेच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवलं, आणीबाणीवर मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 10:47 AM