नेहरूंमुळे 'चायवाला' पंतप्रधान? नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांना दिले असे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 03:22 PM2018-11-16T15:22:04+5:302018-11-16T15:23:22+5:30
जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. आता मोदींनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे...
अंबिकापूर ( छत्तीसगड) - जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. दरम्यान, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी थरूर यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. चार पिढ्या राज्य करणाऱ्यांनी आपल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे, पण ते चार वर्षे काम करणाऱ्यांकडे हिशोब मागत आहेत, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार रंगला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंबिकापूर येथे सभा घेतली. या सभेमध्ये मोदींनी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी चायवाला संबोधून केलेल्या टिप्पणीचा आधार घेत काँग्रेसवर सडकून टीका केली. " आता काँग्रेसवाले म्हणताहेत की नेहरूंमुळे एक चायवाला देशाचा पंतप्रधान बनला. आता तुम्ही जर लोकशाहीचा एवढाच सन्मान करत असाल तर एक छोटंस काम करा. जर तुम्ही पंडित नेहरू आणि संविधानामधील तुमच्या भूमिकेमुळे एक चायवाला पंतप्रधान बनला, असा दावा करत असाल तर केवळ एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले.
भाजपा सरकार कुठलाही भेदभाव न करता काम करत आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा मंत्र् आहे, असा दावाही मोदींनी यावेळी केला. तसेच भाषणादरम्यान अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करताना वाजपेयींनी रक्ताचा एक थेंबही वाहू न देता राज्याचे विभाजन केले होते, असेही मोदींनी सांगितले.
These people still have not come to terms that I am the PM, it has been nearly four and a half years. They are still crying, how can a 'Chaiwala' become PM?. Now they say a 'Chaiwala' became PM because of one great person: PM Modi in Ambikapur #ChhattisgarhElectionspic.twitter.com/ffYa3nBr7Z
— ANI (@ANI) November 16, 2018
यावेळी निर्मलबाबांचे नाव न घेता मोदींनी काँग्रेसवर टीका केली. " टीव्हीवर एक बाबा येतात. ते सांगतात की जिलेबी खा, कृपा होईल. तसेच काँग्रेसवालेही बाबा झाले आहेत. ते सांगतात केवळ हे बटण दाबा, मग कृपा होईल. काँग्रेसच्या चार पिढ्यांना देशाने पारखले आहे. आता तुम्हीच सांगा त्यांच्या चार पिढ्यांनी काय काम केले ते." असा टोला मोदींनी लगावला.