नवी दिल्ली - कोरोना व्हायरस महामारीचा देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. या महामारीमुळे, देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मोठी घेषणा केली. आता केंद्र सरकारने देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्वतः एमएसएमई मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली. (Narendra Modi govt big announcement retail and wholesale trade now include in msme)
एमएसएमई मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या समस्येचा किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर झालेला परिणाम लक्षात घेत, आता त्यांना MSME च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
गडकरी म्हणाले, हे क्षेत्र प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगअंतर्गत आणून आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता किरकोळ आणि घाऊक व्यापारीही उद्योगाचे रजिस्ट्रेशन करू शकतील. यामुळे त्यांना आरबीआयच्या नियमांप्रमाणे बँकांकडून स्वस्त कर्ज मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने किरकोळ आणि घाऊक व्यापारांना एमएसएमईमध्ये समाविष्ठ करण्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे.
सरकारच्या या निर्णयाचा 2.5 कोटीहून अधिक व्यापाऱ्यांना फायदा होईल. तसेच, मोदी सरकार एमएसएमईला (MSME) देशाच्या इकोनॉमिक ग्रोथचे इंजिन बनविण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.